चार वेदांचे विवरण असलेले अभंग लक्षात घेऊन चार अष्टकोन अभंगांकरिता व या सर्व अभंगाचे उद्गाते म्हणजेच जगद्गुरु श्री. तुकोबाराय ते मध्यभागी पाचव्या अष्टकोनात अशी पाच अष्टकोनाची पौराणिक स्वरूपाकृती तयार झाल्यावर फाल्गुन वद्य द्वितीया ७/३/१९९६ या श्री. तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनदिनी पायाभरणी समारंभ होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
बारा वर्षाच्या एक तपाच्या कालखंडात तीन मजली स्वरूपाचे पौराणिक पद्धतीचे नऊ शिखरे आणि ३३ कळस असलेले पाच अष्टकोनात्मक मंदिर तयार झाले. उच्च प्रतीच्या मार्बलवर अभंग कोरुन बन्सी पहाडपूर दगडाच्या नक्षीदार खांबाच्या वेलबुटीच्या कोंदणात ते बसविण्यात आले. जगद्गुरु श्री. तुकोबारायांच्या जन्माला चारशे वर्ष २००८ ला पूर्ण होत आहेत. याच उचित वेळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या साधनेतून गाथा पारायणाच्या अनुष्ठानाने भव्य असा उद्घाटन सोहळा करुन ही मूर्तीस्थापना करण्याचे ठरविले व त्यासाठी श्री. तुकोबारायांच्या बीजोत्सवाचा सदेहवैकुंठगमन सोहळ्याचा काल निश्चित केला.