गाथा मंदिर वेळ - सकाळी ६ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ७ वा. , संद्याकाळी ७ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 

जगद्गुरु तुका अवतार नामयाचा l संप्रदाय सकळांचा येथूनिया ll

जगद्गुरु श्री. तुकोबारायांची वाणी अखिल विश्वाला मार्गदर्शक, सर्वशास्त्रसारसंग्रहभूत अशी आहे. गाथा मंदिराच्या रूपाने दगडांवर कोरलेले हे अभंग वाङ्मय अखिल विश्वाच्या हृदयपटलावर कोरण्यासाठी गाथा मंदिर प्रकल्पाचा प्राण असलेले संत श्री. तुकोबाराय गुरुकुल.

प. पू. परम श्रध्येय स्वामी श्री. गोविंददेव गिरिजी महाराजांच्या संत श्री. ज्ञानेश्वर गुरुकुलाद्वारे अर्थ सहाय्य लाभलेली व परम श्रद्धेय स्वामीजी तसेच प. पू. सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेली समर्थ रामदास स्वामी साधक निवास ही भव्य अशी ३ मजली इमारत. त्यात साधकांना अध्यात्मिक शिक्षण देणारे गाथामंदिराद्वारे संचलित ‘संत श्री. तुकोबाराय गुरुकुल’ स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री. जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महापर्वात इ.स. २०१६/१७ ला त्यांच्याच मूलभूत संकल्पनेवर सुरु झालेले एक सर्वांग परिपूर्ण आदर्श गुरुकुल.

  • साधकांना निःशुल्क शिक्षण देणारे समर्पित प्रशिक्षित अध्यापक.
  • साधकांना शिक्षण, निवास, भोजनप्रबंध इत्यादी सर्व नि:शुल्क सुविधा.
  • शांकरभाष्यासह श्रीमद्भगवद्गीता, दशोपनिषदे, ब्रह्मसूत्र ही वेदान्त प्रस्थानत्रयी व श्री. ज्ञानेश्वरी, श्री. एकनाथी भागवत, श्री. तुकाराम महाराज गाथा ही वारकरी प्रस्थानत्रयी तसेच हे सर्व आकलन होण्यासाठी लागणारे प्रारंभिक-माध्यमिक ग्रंथ उदा. लघुसिद्धांतकौमुदी, तर्कसंग्रह, वेदान्तसार, सद्गुरू श्री. जोग महाराज लिखित वेदान्तविचार, वेदान्तपरिभाषा, पंचदशी, भगवद्भक्तीरसायन इत्यादी आवश्यक ग्रंथांचे संस्कृत, मराठी, हिन्दी व इंग्रजी या चार भाषेतून पाच वर्षे नियमित व दोन वर्षे ऐच्छिक असे सात वर्षांच्या समग्रकालखंडात सांप्रदायिक पद्धतीने दिले जाणारे मोफत शिक्षण.
  • केंद्रिय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली व सम्पूर्णानन्द संस्कृत विश्वविद्यालय वाराणसी या यु.जी.सी. प्रमाणित विश्वविद्यालयाच्या प्राक्शास्त्री- ११/१२ वी समकक्ष, शास्त्री - बी.ए. समकक्ष, आचार्य - एम.ए. समकक्ष या पदवी परीक्षांची ऐच्छिक सशुल्क सुविधा.
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, क्रीडांगण, वेळोवेळी विशिष्ट अतिथी अध्यापकांद्वारे ज्ञानसत्रे, विशिष्ट व्याख्याने, परिसंवाद, कार्याविषयी मार्गदर्शक शिबिरे तसेच निष्काम ज्ञानदानाची वृत्ती अंगी बाणण्यासाठी वार्षिक निष्काम अखण्ड फिरता हरिनाम सप्ताह इत्यादी गोष्टींचे आयोजन.
  • वारकरी उपासना अंगांना पुष्टी देणारी आषाढी पायी वारी, कार्तिकी वारी, प्रत्येक वद्य एकादशीला देहू ते आळंदी ही महिना पायीवारी, नित्यनेम-योगासने, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, मृदंगवादनादी विषयांचे सांप्रदायिक अंगाने शिक्षण.
  • अध्ययनाला ऊर्जा देण्यासाठी संस्कृत सम्भाषण, प्रतिभा प्रदर्शन, श्री. गणेश वाग्विलासिनी वक्तृत्व स्पर्धा, श्री. शारदा अक्षरविलासिनी लेखन स्पर्धा, चार भाषांमधून होणारी कीर्तन-प्रवचनाची परीक्षा इत्यादी स्पर्धांचे उत्कृष्ट बक्षीसांसह आयोजन.

संत श्री. तुकोबाराय गुरुकुल प्रवेश प्रक्रिया

प्रवेशार्थी विद्यार्थी अध्यात्मिक शिक्षणाची आवड असलेला, १० वी किंवा त्यापुढील परीक्षा उत्तीर्ण झालेला, वयाची १६ वर्षे पूर्ण केलेला, श्री. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, श्री. एकनाथ महाराज हरिपाठ व चिरंजीव पद पाठ असलेला तसेच गुरुकुलाद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा.

प्रवेश काल - वैशाख शुद्ध प्रतिपदा.