गाथा मंदिर वेळ - सकाळी ६ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ७ वा. , संद्याकाळी ७ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 

।। श्री तुकोबाराय ।।

नमो सदगुरु तुकया ज्ञानदीपा

संतह्दयसम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हे भारतातील महाराष्ट्र प्रान्ताच्या पुणे जिल्ह्यातील देहू गावात शके १५३० मध्ये माघशु ।। पंचमीस जन्माला आले. मानवी वेषधारी परंतु निर्विकारी, लीलाविग्रही असे अलौकिक संत झाले. वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्ममंदिराचे ते कळस ठरले. तुका झालासे कळस याचा अर्थ जशी कळसामध्ये मंदिराची परिपूर्णता तशी संतत्वाचे बाबतीत श्री तुकोबारायांचे ठिकाणी सर्वप्रकारे परिपूर्णता. असे महाराष्ट्रीय संतमादियाळीमध्ये श्री तुकोबारायांचे स्थान अनन्य असे आहे.

महाराजांचे मूळपुरुष श्री.विश्वंभरबाबा हे श्री पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. महाबळेश्वराच्या पायथ्याशी प्रसिद्ध अशा जावळी खोऱ्यांत चंद्रगुप्त मौर्यांचे हे तेजस्वी असे क्षात्र घराणे पुढे 'मोरे' या नावाने रूढ झाले. मराठ्यांच्या आपसातील वैरास कंटाळून जावळीची देशमुखी सोडून श्री. विश्वंभरबाबा देहूस आले. त्यांची पांडुरंगाची निःस्सीम भक्ती होती. महिन्याची वारी होती. वृद्धापकाळी त्यांच्याकरिता पांडुरंग स्वप्नदृष्टान्ताने देहूस आले. त्या विश्वंभरबाबाच्या संस्कारय्युक्त परंपरेत सात पिढ्यांची अखंडित सेवा होऊनच आठवे पुरुष जे जन्मास आले ते श्रीतुकोबाराय होत. पिता बोल्होबा व माता कनकाई होय. घरांत महाजनकी -सावकारकी होती. करवसुलीचा अधिकार होता. अशी शुचिष्मंत श्रीमंती होती. बोल्होबांना तीन मुले, थोरला सावजी, दुसरे श्रीतुकोबाराय व धाकटे कान्होबाराय. ही तिन्हीही मुले पारमार्थिक साधुवृत्तीची होती.

वयाच्या ११ व्या वर्षी श्रीतुकोबारायांचा प्रथम विवाह लोहगावच्या मोझे घराण्यातील रखुमाईशी झाला. त्याना दम्याचा विकार म्हणून वयाच्या १३ व्या वर्षी दुसरा विवाह पुण्यातील श्रीमंत संस्कारले व विरक्तवृत्तीच्या सावजींने महाजनकी व व्यापाराचा भार स्वीकारलाच नाही. तोच भार श्रीतुकोबारायांवर पडला. त्यांनी तो वयाच्या १७ व्या वर्षापर्यन्त समर्थपणे व्यवस्थित पार पाडला.

देव भक्तालागी करू नेदी संसारा ।

वयाच्या १७ व्या वर्षीच महाराजांचे पिताश्री बोल्होबा महाराज वैकुंठवासी झाले. वयाच्या १८ व्या वर्षी वडीलबंधू सावजीची पत्नी वारली. त्यानंतर सावजी जे त्याग करून वनांत गेले ते परत आलेच नाहीत. या सर्व आपत्तींना महाराज धीरोदात्तपणे तोंड देतच होते. व प्रपंच सावरीत होते. परंतु केवळ स्त्रीपुत्रादिक व धनधान्याचा संसार करण्याकरीता कां संतांचे जीवन थोडेच आहे? संसाराच्या नावाने शून्य घालून हरिभजनाने जग धवळण्याकरिता आलेले महापुरुष उपाधीत रहावेत हा ईश्वराचा हेतू नाही. म्हणून तर तो त्यांना काही तरी निमित्ताने “वसुधैव कुटुंबकम्” या भूमिकेवर ओढून नेतो. तुकोबारायांचे ऐन तारुण्यांत संपूर्ण महाराष्ट्रावर एक दैवी आपत्ती आली ती म्हणजे दुष्काळ. शके १५५० ला पाऊस अतिशय कमी प्रमाणात व १५५१ ला तर अजिबात पाऊस पडलाच नाही. अन्नान्न दशेत लोक तडफडून मेले. जनावरे मेली. थोरली पत्नी व मुलगा संताजी हाही मरण पावला. अगोदर माता-पिता, भाऊजय गेली, बंधूचा वियोग, दुष्काळ, पत्नी व पुत्राचे निधन. सावकारकी बसली. सर्व संसारपट उधळून गेला.

लोकांचे हाल पाहून श्रीतुकोबारायांचे संस्कारी मन हळवे बनले. हृदयद्रावक आक्रोशाने सावकारी वृत्ती केव्हांच नष्ट होऊन येतो “हिताचा कळवळा” हे संतहृदय विकसित झाले. संपूर्ण ऐहिक जीवनाची आशा निघून गेली. शके १५५२ ला तर अतिवृष्टि होऊन उरले सुरले सर्व नष्ट झाले. आपल्या संसाराचे काय? यापेक्षा जगाच्या संसाराचे काय? यांच्याकडटून सावकारकीचे काहीहि वसूल करायचे नाही, या सर्व गोष्टीचा संकेताचा प्रेरक कोण? या सर्व चिन्तनाने उद्विग्न झालेले श्रीतुकोबाराय दृश्याच्या पलिकडे असलेल्या अदृश्य ईश्वराची उत्कंठा वाहून त्यांनी देहूसोडली व अज्ञात स्थळी श्रीक्षेत्र भामगिरीवर कोणालाही माहीत न होता निघून गेले.

कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल ।

सर्व बाबतीत उदास होऊन भामचन्द्राच्या दरीत विठ्ठलाचा शोध घेत फिरू लागले. दिव्य शक्तीचा, प्रेरकाचा, सूत्रधाराचा शोध घेत होते. कोण आहे जगन्नियंता, पाऊस कोण पाडतो? दुष्काळाचा संकेत कोणाचा? ऐहिक जीवनाचा अंत फक्त मरणातच आहे कां? जीवांना प्रेरणा कोण देतो? देव फक्त मंदिरातच आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते शोधू लागले. अशा विमनस्क अवस्थेत १५ दिवस संपले. अन्नपाणी नाही. अंगास सर्प विंचू झोंबल्याची जाण नाही. वाघाने झेप घेतल्याचे भान नाही. फक्त ईश्वराचा ध्यास लागला होता. १५ वे दिवशी संपूर्ण जगतामध्ये नटलेल्या जगदीशाचे चिरंतन ज्ञान झाले. निराकार ईश्वराचा तो साक्षात्कार होता. त्यामुळे महाराज आनंदित झाले. नरनारीबाळे नारायणरूपाने प्रतीतीस आली व या दिवसापासून आकाशाएवढा तुका प्रगट झाला.

जिजाबाईंनी श्री कान्होबारायास शोध घेण्यास पाठविले, पंचक्रोशीत फिरले. डोंगरदऱ्या शोधल्या, आर्ततेने हाक मारावी. भामगिरीच्या दिशेने गेल्याचे संकेत मिळाल्यावर भामगिरीच्या गुहेत ईश्वरचिंतनात मग्न असलेल्या, आनंदमूर्तींचे दर्शन झाले. कडकडून मिठी मारली. वहिनीची, मुलांची अवस्था सांगितली. घरी चलावे असा आग्रह धरला. त्यांना काय ठाऊक की, आपले बंधू सर्व पाशातून मुक्त झाले आहेत. कान्होबारायांच्या आग्रहाने देहूकडे आले खरे. पण आता लौकिक जीवनाचे आकर्षण नव्हते. पोटासाठी संसार करण्याचा संकुचितपणा राहिला नव्हता. दोघे बंधू इंद्रायणीच्या डोहाजवळ बसले. लोकांना जी कर्जे दिलेली होती ती कर्जखते कान्होबारायांस आणायला लावली व म्हणाले जनतेला तारण्यासाठी ही कर्जखाते बुडवायची. कान्होबा! अरे! तरच जनता तरेल! कान्होबाराय म्हणाले तुम्ही विरक्त झाला आहात. मला संसार आहे.

महाराजांनी कान्होबारायाचा भाव जाणून दोन समान भाग केले व आपला भाग-स्वार्थ जनहितार्थ डोहांत बुडविला. कर्जे वसूल केली तर जनता रसातळाला जाईल. ते पुन्हा उठू शकणार नाहीत. केवढी ही समाजहिताची उत्तुंगता! स्वार्थ ध्यानात न घेता या धनकोने सर्व कर्जखते डोहात बुडवून क्रणकोंना कर्जमुक्त केले. देशात पहिली कर्जमुक्ती करणारे संत तुकोबाराय हे आहेत. याला म्हणतात खरा 'समाजवाद' श्री तुकोबारायांच्या कार्याचा हा प्रारंभबिंदू आहे. ही कृती म्हणजे एक बीज असून तेच पुढे तुकोबारायांच्या जीवितकार्याच्या रूपाने अंकुरले, मोहरले, फुलले, बहरले व दरवळले आहे. ह्या कृतीभोवती महाराजांचे जीवन परिघभूत झाले. महाराजांच्या जीवनातला हा चमत्कार न समजून येणारा महान चमत्कार आहे. ह्या घटनेतून महाराजांचे चरित्र हाती लागते. कर्जखाते बुडविणे व लोकांना कर्जातून मुक्त करणे, रंजल्या गांजल्याचे दुःख दूर करणे हेच खरे संतत्व होय. काही अलौकिक चमत्कार करून जनतेला फसविणे हे महाराजांच्या दृष्टीने कपट-ढोंग आहे. ती कर्जखाते बुडवून ते घरी परतले आणि अखेरपर्यंत अलिप्त राहिले.

भंगलेल्या संसाराचा विचार न करता पांडुरंगाचे भंगलेले मंदिर, त्याचा जीर्णोद्धार केला. कर्मसाम्यदशेवर आलेल्या श्रीतुकोबारायांवर अनुग्रह करण्यासाठी चैतन्यसंप्रदायी श्री बाबाजी चैतन्य स्वतः होऊन आले व स्वप्नावस्थेत गंगास्नानास चाललेल्या श्री तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेऊन त्यांना रामकृष्ण हरि' हा सर्वश्रेष्ठ मंत्र दिला. येणेप्रमाणे गुरुकृपा होऊन महाराज परिपूर्ण झाले. नंतर श्री पांडुरंग व भक्तप्रवर नामदेवराय यांनी स्वप्नामध्येच जागे करून विश्वोद्धारार्थ अभंगरचना करण्यास सांगितले. मग वर्षाकाळीच्या मेघाप्रमाणे 'अमृताची वाणी वरुषला शुद्ध प्रासादिक वाणीतून प्रसवलेले हे काव्य जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे तर ठरलेच पण पंडितांना आश्चर्यजनक वाटू लागले.

पंडितांनी अनंतकाळचे भारताचे हे शब्दधन आपल्या विद्वत्तेच्या बंधनात कोंडून ठेवले होते. ते ज्ञान श्रीतुकोबारायांनी अहंमन्य पंडितांना जबरदस्त धक्का देऊन, तुम्ही भारवाही आहात, आम्ही अर्थज्ञाते आहोत. अशाप्रकारे मक्तेदारीतून मुक्त केले. ते भगवंतप्रासादिक ज्ञान, माधुर्ययुक्त रसभरित ज्ञान सर्व जनतेच्या जिभेवर नाचू- खेळूलागले. आबालवृद्ध, माता भगिनी, शेतकरी, व्यापारी, सर्व जनता यांत सम्मिलित होऊ लागली. याचा अहंकारी पंडितांवर विपरीत परिणाम झाला. मंबाजी गोसावी, सालोसाली यांनी वाघोलीच्या न्यायमूर्ती रामेश्वर शास्त्रीकडे तक्रार केली. त्यांनी प्रत्यक्ष विचारणा केली असता देवाच्या आज्ञेने मी काव्य करतो असे महाराजांनी सांगितले. आम्ही भूदेव सांगतो काव्य करु नका व केलेले अभंग दगड बांधून इंद्रायणीच्या डोहांत बुडवावे ही आज्ञा केली. ती आज्ञा शिरसावंद्य मानून दगड बांधून ते डोहात बुडविले.

उदकी रक्षिले कागद । चुकविला जनवाद ।

वह्या बुडविल्याचा खेद नाही पण आता अभंगरचना करा सांगणारा देव आता कुठे गेला. कसला देव? व कसली तुमची भक्ति? थोतांड आहे. मग देवाविषयीच्या नास्तिकवाद घालून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व भक्तीचे महत्व जनतेच्या व पंडिताच्या लक्षात आणून देण्यासाठी श्री तुकोबारायांनी त्याच डोहाच्या तीरावरील एक शीळेवर अनुष्ठान मांडले. अन्नपाणी वर्ज्य केले. तेरा दिवस महाराजांनी हे निश्चक्र केले. तेव्हा देवाचा धांवा केला. चौदाव्या दिवशी सकाळी भगवान बालवेशांत प्रगट होऊन दर्शन दिले. सदूगदित कंठाने त्यांनी पांडुरंगास मिठी मारली. पांडुरंगाचा साक्षात्कार- प्रगट दर्शन महाराज आनंदित झाले. पांडुरंगाने दगडासहित तरलेल्या वह्या दाखविल्या.

बुडविणाऱ्यांना दृष्टांन्त दिला. अनुयायी, ग्रामस्थ, विरोधक धावत आले. पाण्यात अठरा दिवस सुरक्षित राहिलेले काव्य त्यांनी पाहिले. तेव्हां हे अजरामर काव्य असून आपण महाराजांचा जो छळ केला त्याबद्दल सर्वांना पश्चाताप होऊन सर्वजण महाराजांचे भक्त बनले. रामेश्वर भट्टानाही प्रचीती आली. अभंगदर्शनात त्याच्या अंगाचा दाह शांत झाला. तोहि अनुयायी - भक्त बनला. ही सर्व कीर्ती ऐकून विरक्तीचा अनुभव येऊन छत्रपती शिवाजी राजेहि भक्त बनले. कीर्तन श्रवणास येऊ लागले. महाराजांनी या सर्व अनुयायांच्या सहकार्याने व अमोघ अमृतवाणीच्या वर्षावाने सर्व समाज ढवळून काढला. भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरावरही एकान्तात नामचिंतनाचा आनंद लुटीत व सर्व रस आणिकांनाही वाटीत होते. 'जाळूनी संसार' फकीर झालेल्या या महात्म्याची अवस्था समजून धर्ममूर्ति जीजाबाईने महादेव, विठ्ठल, काशी, भागीरथी चार लेकरांचा सांभाळ करीत. श्री तुकोबरायांना असेल त्या डोंगरावर जाऊन शोधून जेवण घालावे व मगच आपण जेवावे अशी पतिसेवा निष्ठेने केली. त्या सेवेने भारावून देवाने तिलाही दर्शन दिले आहे. महाराजांनी स्वतः भक्तिरसाचा आनंदलुटला व जनतेलाही दिला.

आपुल्या माहेरा जाईन मी आता

संत या लोकांत केवळ धर्मासाठी अवतार घेतात व आपले कार्य पूर्ण झाल्यावर कोणताही मोह न धरता निजधामास जातात. केवळ २१ वर्षात आपल्या कीर्तीचा सोहळा भूमंडळी व वैकुंठातही गाजविला. एकनिष्ठ गुरुभक्त निळोबारायांनी श्रीतुकोबारायांचे कार्य आरतीमध्ये सुंदर गायिले आहे.

अद्धूत वर्तक श्री तुकोबाराय

सर्व प्रपंचरचना भोगून त्यागतो, अनुतापाच्या ज्वालामुखीमध्ये देहबुद्धीचे हवन केले, वैराग्याची निष्ठा प्रगट करून दाखविली, अहंता- ममता घालवून निजशांतीला वरली, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ति व ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला, जगाला उद्धाराकरीता उपया सुचविला. निंदक, दुर्जन यांचा संशय दूर केला. अठरा दिवस पाण्यात असलेल्या अभंगवह्या कोरड्या अशा दाखविल्या, अपार काव्य निर्माण केले. कीर्तनाने, श्रवणाने जनतेचा उद्धार केला. बालवेषात देवाने दर्शन दिले. विधीचा जनिता आठवून दिला. इतर कशानेही तुकले जात नाही म्हणून 'तुकाराम* नावाने गौरविले. भक्ति, ज्ञान व वैराग्याने आगळे असणारे व हरिनाम कीर्तन करून जप-तप, यज्ञ, दान यांना लाजविणारे तुकोबाराय होय. शेवटी प्रयाण कालात देवाने विमान पाठविले असता सर्वांचा निरोप घेऊन कलीच्या कालचक्रात अद्भूत वर्तवीत मानवदेह घेऊन निजधामाला जाऊन सर्वांना संतांना संतुष्ट करणारे श्रीतुकोबाराय या मानवी शरीरासह गुप्त झाले.

हरि: ॐ तत्सत्